Pune : नानासाहेब पेशवे समाधीवर शिवसैनिकांकडून स्वच्छता मोहीम
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याच्या वादानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली आहे. शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी नदीपात्रातील नानासाहेब पेशवे यांच्या समाधी स्थळाची स्वच्छता मोहीम राबवली.
वसंत मोरे यांनी या वेळी भाजपवर निशाणा साधत म्हटलं, “एका बाजूला तुम्ही शनिवार वाड्यात नमाज पठण झालं म्हणून गोमूत्र शिंपडून स्वच्छता करता, पण ज्यांनी पुण्यातील शनिवारवाडा बांधला, त्या नानासाहेब पेशव्यांची समाधी आजही दुरवस्थेत आहे. तिथे स्वच्छता नाही, देखभाल नाही, आणि याबद्दल कोणालाच काळजी नाही. हेच तुमचं बेगडं हिंदुत्व!” असा थेट टोला त्यांनी भाजपला लगावला.
मोरे पुढे म्हणाले की, “मी गेली तीन वर्षं या प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे, परंतु प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे. जर प्रशासनाने मनात आणलं, तर हा प्रश्न सोडवणं अजिबात कठीण नाही.” पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न वसंत मोरे यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे हा नानासाहेब पेशवे समाधीचा प्रश्न सुद्धा सुटेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर, त्यांचा मुलगा रुपेश मोरे हा सुद्धा आता राजकारणात सक्रिय होत असून स्थानिक पातळीवर कार्यरत आहे.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान वसंत मोरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा रुपेश मोरे, तसेच संजय मोरे आणि अनेक शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आता पुढील काही दिवसांत महानगरपालिका प्रशासन या विषयाची दखल घेते का, आणि नानासाहेब पेशव्यांच्या समाधीच्या दुरुस्तीबाबत काही ठोस पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

