Thane Metro : ठाणेकरांचा वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग?
मुंबईसह (Mumbai) आसपासच्या उपनगरांतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. मेट्रोचे अनेक प्रकल्प त्याच धर्तीवर ठाणे (Thane News) शहरातही प्रगतीपथावर असून, आता ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो (Thane Metro) प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या मेट्रो प्रकल्पामुळे ठाणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने 223.70 कोटी रुपयांची निविदा महामेट्रोने जाहीर केली आहे. या निविदेअंतर्गत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि वॉटरफ्रंट या ठिकाणी उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
29 किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग, 22 स्थानके
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो मार्गाची एकूण लांबी 29 किलोमीटर असून, या मार्गावर एकूण 22 मेट्रो स्थानके असतील. 6 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 6 स्थानकांचे काम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. संपूर्ण मार्गिकेपैकी सुमारे 26 किलोमीटरचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) स्वरूपाचा असेल. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील दोन मेट्रो स्थानके भूमिगत (अंडरग्राउंड) असणार असून, त्यामुळे रेल्वे आणि मेट्रोमधील बदल (इंटरचेंज) अधिक सोपा होणार आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत यांसारख्या ठाण्यातील महत्त्वाच्या अंतर्गत भागांना थेट मेट्रो जोड मिळणार आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान होऊन वेळेची मोठी बचत होणार आहे.
मुंबई–ठाणे–कल्याण प्रवास होणार सुलभ
ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोचा मुंबई मेट्रो 4 आणि मेट्रो 5 मार्गिकांशी थेट संपर्क राहणार आहे. त्यामुळे ठाणे ते मुंबई तसेच ठाणे ते कल्याण असा मेट्रो प्रवास शक्य होणार असून, उपनगरांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दररोज 8.7 लाख प्रवाशांचा अंदाज
2045 पर्यंत या मेट्रो मार्गिकेवरून दररोज सुमारे 8 लाख 70 हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा प्रकल्प सुमारे 12 हजार 200 कोटी रुपये खर्चाचा राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणाराअसून, ठाण्याच्या सार्वजनिक वाहतुकीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
