Aaple Sarkar Portal : आपले सरकार पोर्टल १० ते १४ एप्रिलदरम्यान बंद – नागरिक सेवा पाच दिवसांकरिता ठप्प
महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा येत्या १० एप्रिल ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत पाच दिवसांसाठी बंद राहणार आहेत. या कालावधीत पोर्टलवरील सर्व सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार असून नागरिकांना महसूल, शैक्षणिक प्रमाणपत्रांसह अन्य महत्त्वाच्या सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे.
'आपले सरकार' पोर्टलच्या कामकाज बंद राहण्याची सूचना राज्यातील सर्व सेवा केंद्रांना आधीच देण्यात आली आहे. हे पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) यांनी विकसित केले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सेवा या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. या बंदीमागील मुख्य कारण म्हणजे पोर्टलची नियमित देखभाल व तांत्रिक सुधारणा (टेक्निकल अपडेट्स). पोर्टलवर तांत्रिक दृष्टीने काही सुधारणा करण्यात येणार असून, यामुळे पुढील काळात सेवा अधिक जलद आणि सुरळीतपणे चालू राहतील.
महसूल विभागातील सेवा, शैक्षणिक व निवास प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, जन्म-मृत्यू नोंदींसह विविध शासकीय सेवा या कालावधीत अपूर्ण राहू शकतात. यामुळे नागरिकांनी वेळेत आपल्या आवश्यक सेवा पूर्ण करून घ्याव्यात, असे सरकारने आवाहन करण्यात आले आहे. महाऑनलाइन नागरी सेवाप्रमुख राहुल सुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती आणि शैक्षणिक हंगामाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणावर पोर्टलचा वापर होतो. त्यामुळे अचानक लोड वाढल्यास वेबसाइट स्लो होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ही पूर्वनियोजित तांत्रिक देखभाल करण्यात येत आहे.
नागरिकांनी या पाच दिवसांमध्ये पोर्टलवरील सेवा बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी आणि संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आपली कागदपत्रे किंवा अर्ज १० एप्रिलपूर्वी पूर्ण करावेत. पोर्टल १५ एप्रिलपासून पुन्हा कार्यान्वित होईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे.