Chhatrapati Sambhajinagar : नियतीचा असाही खेळ! वडिलांनंतर महिन्याभरात मुलाचाही मृत्यू, पोलिसांच्या गाडीखाली चिरडून दुर्दैवी अपघात
छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा विमानतळासमोर घडलेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव विष्णू काशिनाथ खर्जुले (वय 24, रा. करमाड) असे असून, महिनाभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. आता पोलिसांच्या वाहनाखाली चिरडून विष्णूचा मृत्यू झाल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोमवारी (16 जून) रात्री पावणे आठच्या सुमारास विष्णू दुचाकीवरून करमाडच्या दिशेने जात असताना चिकलठाणा विमानतळासमोर हा अपघात घडला. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आपल्या चारचाकी वाहनाने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. याचवेळी विमानतळासमोरील गतिरोधकावरून विष्णूच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले.
दुसऱ्या दुचाकीच्या हँडलचा धक्का लागल्याने विष्णू खाली पडला आणि पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाखाली सापडला. अपघातानंतर पोलिसांनी विष्णूला तातडीने मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे रात्री 1:43 वाजता विष्णूवरच निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला, तोही शवविच्छेदन होण्याआधीच.
पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांचे जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याऐवजी थेट विष्णूवरच दोष ठेवत गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विष्णू गतिरोधकावरून उडाला, दुसऱ्या दुचाकीला धडकला आणि मग पोलिसांच्या वाहनाखाली गेला. दुर्दैवाने त्याला जीव गमवावा लागला. मात्र यामध्ये पोलिसांच्या वाहनाच्या वेगाचा किंवा निष्काळजीपणाचा तपास झाला का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या घटनेने एकतरुण आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्यावर काळोखी पसरवली आहे. स्थानिकांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.