Ganeshotsav 2025 : मोठ्या POP मूर्तींच्या विसर्जनाचा पेच कायम; सरकारच्या भूमिकेकडे मुंबई महापालिकेचे लक्ष

गणेशोत्सव काही महिन्यांवर आला असताना, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनासंदर्भातील पेच कायम आहे.
Published by :
Team Lokshahi

गणेशोत्सव काही महिन्यांवर आला असताना, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) पासून बनवलेल्या मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनासंदर्भातील पेच कायम आहे. मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असली, तरी त्यांच्या विसर्जनावर असलेली बंदी अजूनही उठलेली नाही. त्यामुळे आता सरकारची भूमिका काय असेल, याकडे मुंबई महानगरपालिकेचे लक्ष लागून राहिले आहे.

उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मूर्तीकारांनी मोठ्या प्रमाणात POP मूर्तींच्या ऑर्डर नोंदवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः उंचीच्या आणि भव्य मूर्तींसाठी गणेश मंडळांकडून मागणी वाढली आहे. परंतु, या मूर्तींचे विसर्जन नेमके कुठे करायचे, हा प्रश्न पालिकेसमोर उभा आहे.

महापालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था घरगुती गणपती मूर्तींसाठी केली असली तरी, त्या तलावांमध्ये दहा फूटांपेक्षा उंच मूर्तींचे विसर्जन करणे शक्य नाही. त्यामुळे दहा फूटांपेक्षा मोठ्या POP मूर्तींसाठी कोणती पर्यायी व्यवस्था करता येईल, याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही.

यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “घटनेनुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कृत्रिम तलावात विसर्जनाची तयारी करत आहोत. मात्र मोठ्या मूर्तींसाठी काय भूमिका घ्यायची, यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट भूमिका घ्यावी.”

गणेशोत्सवात दरवर्षी हजारो उंच मूर्तींचे विसर्जन समुद्र किंवा तलावात केले जाते. परंतु, पर्यावरणाचे कारण पुढे करत गेल्या काही वर्षांत पीओपी मूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली होती. त्याचवेळी नैसर्गिक मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन देण्याची मोहिमही राबवण्यात आली.

मात्र न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे मूर्ती बनवणे परवानगीस पात्र ठरत असले, तरी विसर्जनाचा मार्ग खुला नाही. त्यामुळे मूर्तीकार, गणेश मंडळं आणि पालिकेसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी हा पेच सोडवण्यासाठी सरकार आणि महापालिका यांच्यात उच्च पातळीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणेश मंडळांनीही विसर्जनासाठीची स्पष्टता लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा

Ganeshotsav 2025 : मोठ्या POP मूर्तींच्या विसर्जनाचा पेच कायम; सरकारच्या भूमिकेकडे मुंबई महापालिकेचे लक्ष
Air India Plane Crash : 'त्या' दुर्घटनेच्या सात दिवसांनंतर रोशनी सोनघरेचा मृतदेह डोंबिवलीत दाखल; लेकीला पाहून आईनं फोडला हंबरडा
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com