Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची मकरसंक्रांत गोड होणार ! 'या' दिवशी मिळणार डिसेंबरचा हफ्ता
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावर आता एक नवीन चर्चेचा विषय समोर आला आहे. ‘लाडक्या बहिणींसाठी मोठी भेट’ या आशयाचा दावा करणारे पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये म्हटले आहे की, येत्या १४ जानेवारीपूर्वी ‘लाडकी बहिन योजना’ अंतर्गत पात्र बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत.
या पोस्टरनंतर अनेक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे, परंतु राजकीय वर्तुळात यावर चर्चा आणि प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. महायुतीतील घटकपक्षांचे उमेदवार त्यांच्या सोशल मिडीयावरून या घोषणेची माहिती देत आहेत. सरकारकडून निधी मकर संक्रांतीच्या दिवशी वितरित केला तर, निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ शकतो का, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबईच्या वॉर्ड २ मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मिडीयावर या योजनेबाबत पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, “सण-उत्साहाचा, क्षण मकर संक्रांतीचा. महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे, म्हणजेच तीन हजार रुपये, १४ जानेवारीपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत.”
घोसाळकर यांनी पुढे सांगितले की, “सण-उत्सवाच्या काळात आर्थिक बळ देऊन बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम ‘देवाभाऊ’ आणि महायुती सरकारने केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ही आर्थिक मदत बहिणींच्या खात्यावर येईल,” असे त्यांनी वचन दिले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारच्या घोषणांमुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, ज्याला आचारसंहिता भंग होण्याचा धोका असल्याचे मानले जात आहे. मात्र उमेदवारांनी हे स्पष्ट केले आहे की, हा निधी सरकारच्या आधीपासून ठरलेल्या योजनेनुसार दिला जात आहे.
सध्या सोशल मिडीयावर या पोस्टरच्या व्हायरल होण्यामुळे बहिणींसह सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, निवडणुकीच्या आगमनासमोर राजकीय आणि सामाजिक चर्चेला नवा वेग मिळाला आहे. नागरिकांनाही माहिती घेऊन, योग्य वेळी आणि नियमांनुसार निर्णय घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
