Sanjay Raut :  'मुख्यमंत्र्यांना मराठीबाबत आस्था,प्रेम नाही'...संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : 'मुख्यमंत्र्यांना मराठीबाबत आस्था,प्रेम नाही'...संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “महाराष्ट्राची फसवणूक सुरू आहे,” असा आरोप करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठी भाषेबाबत अनास्था असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

वसई–विरार येथील एका सभेत मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषेत भाषण केल्याचा दाखला देत, “मुख्यमंत्र्यांना मराठीबाबत आस्था आणि प्रेम नाही,” अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र हा मराठी माणसाचा राज्य आहे. इथे मुख्यमंत्री मराठी भाषेला सर्वोच्च स्थान देणं अपेक्षित आहे. वसई–विरारमध्ये हिंदीत भाषण करून त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला आहे. निदान पेशव्यांचा तरी मान राखायला हवा होता,” असे परखड शब्दांत राऊत यांनी सुनावले. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष सातत्याने दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, भाजप नेते अण्णामलाई यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “अण्णामलाई यांनी केलेल्या विधानाचा भाजपकडून साधा निषेधही करण्यात आलेला नाही. यावरून भाजपची भूमिका स्पष्ट होते,” असे ते म्हणाले. भाजप नेते जाणूनबुजून मराठी भावना दुखावत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी बोगस मतदारांच्या मुद्द्यावरही सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. “बोगस मतदारांना आम्ही फटकावून लावणार आहोत. निवडणुकांमध्ये गैरप्रकार करून सत्तेत राहण्याचा भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे,” असा दावा त्यांनी केला. काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले की, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे, मात्र सत्ताधारी पक्ष त्याला कलंक लावत आहेत. “जनतेला फसवून, पैशाच्या जोरावर सत्ता टिकवण्याचा हा प्रकार महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. आगामी काळात अशा प्रकारांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राऊत यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, सत्ताधारी पक्षाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com