Weather Update : थंडी ओसरली, उकाडा वाढला; बदलत्या हवामानाने नागरिक हैराण
राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून नागरिकांना थंडी, पाऊस आणि उकाडा या तिन्ही ऋतूंचा अनुभव एकाच वेळी येत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावली, तर त्याआधी डिसेंबर महिन्यात राज्यात कडाक्याची थंडी जाणवली होती. सध्या उत्तर भारतातून थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढताना दिसत असून भारतीय हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांसाठी पुढील काही दिवस तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
मात्र, उत्तर भारतात तीव्र थंडी असतानाही महाराष्ट्रात मात्र तापमानात सतत चढउतार पाहायला मिळत आहेत. सकाळ आणि पहाटेच्या वेळी काही भागात गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर ढगाळ वातावरणासह उन्हाचा पारा वाढताना दिसतो आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागांत थंडीचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याचे चित्र आहे.
थंडी कमी झाली असली तरी वायू प्रदूषणाचा प्रश्न मात्र अधिक गंभीर होत चालला आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. मुंबईत सायंकाळच्या वेळी आकाश अंधूक दिसत असून प्रदूषणाची दाट चादर पसरल्याचे चित्र आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ, खोकला यांसारख्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.
पुणे शहर आणि परिसरात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांत किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली असून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तीव्र ऊन आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हरियाणातील नर्नुल येथे देशातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे 3.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. महाराष्ट्रात धुळे येथे 8.8 अंश सेल्सिअस हे राज्यातील नीचांकी तापमान नोंदवले गेले, तर परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान होते. आजही राज्यात तापमानात चढउतार कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार 22 आणि 23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आणि राजधानी दिल्लीत तीव्र थंडीची लाट पसरली आहे. सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. पुढील काही दिवसांत थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
