Sanjay Raut : ‘आयोगानं सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिला’, प्रचार मुदतीवरून राऊतांचा संताप
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची अधिकृत मुदत संपल्यानंतरही निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. उद्या म्हणजेच १५ जानेवारी रोजी मतदान होत असताना, आज १४ जानेवारी रोजी रात्री दहा वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा आयोगाने दिल्याने विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः सत्ताधाऱ्यांवर राजरोस पैसे वाटपाचे आरोप सुरू असतानाच असा निर्णय देण्यात आल्याने आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्लाबोल केला आहे. “आयोगानं आज सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिला आहे,” असा घणाघात करत राऊत यांनी प्रचाराची मुदत संपूनही नियम मोडून सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याची शंका व्यक्त केली. पैसे वाटप करणाऱ्यांना पकडून मारहाण होत असल्याच्या घटनांचा उल्लेख करत, आज दिवसभर ‘बदडण्याचा कार्यक्रम’ सुरू राहील, असेही ते म्हणाले.
राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत म्हटले की, “हिंदू-मुस्लिम मुद्दा आणि पैशाशिवाय हे लोक निवडणूक जिंकू शकत नाहीत. सत्तेचा गैरवापर केल्याशिवाय त्यांना यश मिळत नाही.” याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी “दिसेल तिथे ठोकण्याचा आदेश दिला आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. आजचा दिवस आयोगाने ‘लक्ष्मी दर्शनासाठी दान’ दिल्यासारखा असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, सिंचन घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून अजित पवार यांनी युती सरकारवर केलेल्या आरोपांवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोड्याची भाषा न वापरता थेट नाव घ्या,” असे आव्हान देत, अशी भाषा म्हणजे अप्रत्यक्ष ब्लॅकमेलिंग असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गणेश नाईक किंवा शिंदे गटातील नेते कोणत्या कारणामुळे तुरुंगात जातील, हेही स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. एकीकडे मतदानाच्या तोंडावर वातावरण तापलेले असताना, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे वाद अधिकच चिघळताना दिसत आहे.
