Manikarnika Ghat : वारसा संवर्धन आणि आधुनिक विकासाचा संघर्ष, मणिकर्णिका घाट चर्चेचा केंद्रबिंदू
काशी नगरीतील पवित्र आणि ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पाडकामामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १७७१ साली बांधलेला हा घाट आणि १७९१ मध्ये नूतनीकरण केलेला परिसर बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केला जात असल्याचा आरोप इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे .मणिकर्णिका घाट हा काशीतील ८४ प्रमुख घाटांपैकी एक असून, या घाटासह हरिश्चंद्र घाटाचे नूतनीकरण देखील करण्यात येणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये ३०० वर्षांहून जुनी दगडी रचना आणि ऐतिहासिक ठेव्यांवर परिणाम झाला आहे, असा आरोप अनेकांनी केला आहे.
इतिहासप्रेमी, धार्मिक भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या मते, या पाडकामामुळे केवळ ऐतिहासिक वारसा नाही तर धार्मिक श्रद्धा देखील दुखावल्या जात आहेत. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, वारसा संवर्धन आणि शहर विकास यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया आणि स्थानिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी पाडकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि “ऐतिहासिक वारसा नष्ट करून आधुनिक विकास साधता येतो का?” असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभागाकडून अद्याप स्पष्ट विधान आलेले नाही. तथापि, तज्ज्ञ आणि इतिहासप्रेमींनी सुचवले आहे की, सुरक्षित पद्धतीने पुनर्विकास करून ऐतिहासिक वास्तू आणि मूर्त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. मणिकर्णिका घाटाचा हा वाद पुन्हा एकदा देशभरात इतिहास संवर्धन आणि आधुनिक विकास यामधील संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की, प्रशासन आणि पुरातत्व विभाग या वादग्रस्त कामावर कसे तोडगा काढतात, आणि पावित्र्य राखताना विकासाचे उद्दिष्ट साधले जाते की नाही.
