Exclusive : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'फुले' चित्रपट आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित
दिग्दर्शक अनंत महादेवन अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा यांचा 'फुले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला 'यु' सर्टिफिकेट दिले असून आता याच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
काय आहे प्रकरण
'फुले' चित्रपट जातीयवाद वाढवणार असल्याचे सांगत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी 'फुले' चित्रपटातील काही सीन्सवर आक्षेप घेतला होता. चित्रपट एकतर्फी नको तो सर्वसमावेशक हवा, असेही ते म्हणाले होते. चित्रपटातून जातीयवाद वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा ब्राह्मण महासंघाने केल्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळांची भेट घेतली. यानंतर रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनंत दवे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केल्याने फुले चित्रपटावरून वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी हा चित्रपट कोणाच्या समर्थनार्थ आहे किंवा कोणाच्या विरोधात आहे, हे ट्रेलर पाहून ठरवता येणार नाही. या चित्रपटात दोन्ही घटकांना समानता दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने ही या चित्रपटाला 'यु' सर्टिफिकेट दिलंय म्हणजे त्यांची ही इच्छा आहे, लहान मुलांनी देखील हा चित्रपट पाहावा, असे म्हणत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.