Ganesh Chaturthi 2025 : गणेशपूजेत दुर्वा अर्पणाची योग्य पद्धत; जाणून घ्या धार्मिक महत्व
गणेशोत्सवाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. घराघरांत बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. नैवेद्य, सजावट आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. पण गणपतीच्या पूजेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्वा. शास्त्रात म्हटलं आहे की, गणेशपूजा दुर्वेशिवाय पूर्ण होत नाही. मात्र या दुर्वा कोणत्या बोटाने, कुठे आणि किती वाहाव्यात याची विशिष्ट पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया दुर्वा वाहण्याचं महत्व आणि धार्मिक पद्धत.
दुर्वा का प्रिय आहेत गणपतीला?
भगवान शिवाला जशी बेलपत्र, भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, तशाच गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणेशाचे मुख गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहिल्या जातात, असे शास्त्र सांगते.
दुर्वा या अनंत मुळांनी वाढतात, सतत विस्तारत राहतात. त्यामुळे वंशवृद्धी आणि समृद्धी यासाठी गणेशाला दुर्वा अर्पण केल्या जातात. जीवन हे जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकलेले आहे. संसारचक्रातून मुक्त होण्यासाठी गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे.
याशिवाय दुर्वा सर्व दोषांचा नाश करतात, संकटं दूर करतात आणि शुभफल देतात असा धार्मिक समज आहे. पुराणांनुसार दुर्वांची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या रोमकूपातून झाली, म्हणूनही त्या पवित्र मानल्या जातात.
गणेशाला दुर्वा कशा असाव्यात?
गणेशपूजेत अर्पण करण्यासाठी दुर्वा हिरव्या, ताज्या आणि स्वच्छ असाव्यात. शक्यतो त्या श्वेतवर्ण मिश्रित म्हणजेच किंचित पांढऱ्या रंगाच्या असाव्यात असे शास्त्र सांगते.
दुर्वा नेहमी तीन किंवा पाच पानांच्या असाव्यात. अशा दुर्वांना शुभ मानलं जातं आणि त्या गणपतीला वाहाव्यात.
गणपतीला किती दुर्वा वाहाव्यात?
गणेशाला नेहमी २१ जुड्या दुर्वा वाहाव्यात अशी परंपरा आहे. यामागे धार्मिक कारणही आहे.
योगशास्त्रानुसार जीवाला २१ प्रकारची दुःखं भोगावी लागतात. त्या दुःखांचा नाश होऊन मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी गणेशाला २१ दुर्वा वाहण्याची प्रथा रूढ झाली आहे.
दुर्वा कुठे व कोणत्या बोटाने वाहाव्यात?
गणेशाला दुर्वा अर्पण करताना योग्य पद्धत पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकजण दुर्वा सोंडेवर, पायाशी किंवा कुठेही ठेवतात. पण शास्त्र सांगते की, दुर्वा नेहमी करणे (कान) किंवा शिरसी (डोक्यावर) वाहाव्यात.
तसेच त्या वाहण्याची बोटांची विशिष्ट पद्धत आहे. दुर्वा नेहमी अनामिका, मध्यमा आणि अंगठा या तीन बोटांनी वाहाव्यात. असे केल्याने पूजा शास्त्रानुसार पूर्ण होते.
गणेशपूजेत दुर्वा वाहणे ही केवळ परंपरा नाही तर त्यामागे खोल धार्मिक अर्थ दडलेला आहे. वंशवृद्धी, समृद्धी, दुःखांचा नाश आणि मोक्षप्राप्ती यासाठी दुर्वा अर्पण करण्याची पद्धत शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाला दुर्वा वाहताना ही योग्य पद्धत नक्की पाळा.