छत्रपती संभाजीनगरमध्ये देशातील पहिली 'इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी'
देशातील पहिली 'इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी' छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे 'चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर' (सीएमआयए) तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी विविध श्रेणींतील उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान केला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग क्षेत्राचा विकास आणि इकोसिस्टिम उभारण्यात सीएमआयएने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांशी त्यांचा विशेष जवळचा संबंध निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.
डीएमआयसी (Delhi-Mumbai Industrial Corridor) प्रकल्पामुळे या भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळाली आहे. या प्रकल्पाअंतर्गत देशातील पहिली 'इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी' छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ मिळत असून, हा परिसर गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण ठरत आहे. राज्य शासन लवकरच या भागात उद्योगांसाठी अतिरिक्त 8000 एकर जमिनीचे अधिग्रहण करणार आहे. याशिवाय, इंडस्ट्रियल रिंग रोड, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, ईव्ही वाहनांसाठी कौशल्य विकास केंद्र, शहर वाहतुकीसाठी उड्डाणपूल आणि फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प यासाठी आवश्यक त्या सर्व कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी तसेच शक्तीपीठ महामार्ग व वाढवण बंदर सारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची प्रगतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे, सीएमआयएचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध उद्योजक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.