World Music Day 2025 : देशातील पहिला रेडिओ महोत्सव रंगणार मुंबईत; 21 जून रोजी 'महाराष्ट्र आशा रेडिओ पुरस्कार' सोहळ्याचे आयोजन
'जागतिक संगीत दिना'च्या निमित्ताने 21 जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व 'महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025' च्या आयोजनाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. 21 जून रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे 4.30 वाजता सोहळा आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 रेडिओ पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
रेडिओ क्षेत्राला गौरव देणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत सर्व ऐतिहासिक घटनांचा रेडिओ साक्षीदार आहे. महाराष्ट्रात जशी आकाशवाणीने भूमिका निभावली आहे. तसेच खासगीकरण आणि पाश्चातीकरणाच्या काळात खासगी एफएम चॅनेल आणि कम्युनिटी रेडिओनेही भूमिका अधोरेखित केली आहेत. यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
यावेळी प्रदान करण्यात येणाऱ्या 12 रेडिओ पुरस्कारात आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण आशा भोसले' यांच्या नावाने देण्यात येणार आहे. आशा भोसले यांचे संगीत क्षेत्रातील एकूण योगदान लक्षात घेता या नावाने पुरस्कार देण्याचे शासनाने निश्चित केल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांशी रेडिओ निवेदकांसोबत संवाद साधणार आहेत. तर दुसऱ्या भागामध्ये रेडिओशी संबंधीत गाणी, गप्पा-गोष्टी, किस्से यांचे सादरीकरण या सोहळ्यात होणार आहे. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सव व पुरस्काराद्वारे रेडिओ या सशक्त माध्यमाची दखल घेणे, सांस्कृतिक कार्य विभाग व पर्यायाने राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम यांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रेडिओ या माध्यमांचा वापर करणे या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.