Konkan Railway Update : कोकणवासीयांसाठी मोठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव
कोकण म्हणजे दुसरा स्वर्गच जणू, या कोकणातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच ज्याचे गावच कोकण आहे अशा आपल्या हक्काच्या गावी जाण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने कोकणवासी गावाला जात असतात. मात्र दरवर्षी कोकणला जाणाऱ्या गाड्यांची संख्या कमी आणि त्या मानाने लोकांची दुपटीने जास्त संख्या यामुळे अनेकांना कोकणात जाणे जमत नाही. मात्र आता कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आली आहे. इतकी वर्ष केवळ कोकण रेल्वेचा ट्रॅक एकेरी असल्या कारणामुळे गाड्यांची संख्या ही त्यानुसार होती, मात्र आता कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणानंतर गाड्यांची संख्या दुप्पट होणार यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोकण रेल्वे चा दुहेरी मार्गाचे काम रखडलेले होते. तसेच केवळ एकेरी मार्ग असल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये ही काही ताळमेळ नव्हता परिणामी गाड्या वेळेवर स्थानकावर पोहोचत न्हवत्या. मात्र आता कोकण रेल्वे च्या दुहेरी मार्गाच्या कामाला गती मिळाल्यामुळे गाड्यांच्या संख्येमध्ये ही वाढ अपेक्षित आहे. यासंदर्भांत दुहेरी मार्ग झाल्यास दुप्पट रेल्वे गाड्या ही या मार्गावर धावतील अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या दुहेरीकरणासाठी साधारण 15 ते 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून आतापर्यत सार्वजिनक बांधकाम विभागाकडून 99 कोटी रुपये खर्च केले आहेत.
दरवर्षी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप असते त्या मानाने गाड्यांची संख्या कमी असल्या कारणाने कोकण रेल्वे च्या सर्व गाड्यांचे आरक्षण हे काही तासांमध्येच फुल होते परिणामी कोकणातील चारमान्यांना आपल्या गावी जाण्यासाठी पर्यायी खाजगी वाहने किंवा बसेस चा मार्ग निवडावा लागतो. यांच्या तिकिटांचा ही खर्च जास्त असतो. मात्र आता दुहेरीकरण झाल्यानंतर कोकणवासीयांच्या हा प्रश्न सुटणार आहे. आणि याचा निश्चितच फायदा प्रवाशांना घेता येणार आहे. या संदर्भांत दुहेरीकरणाबाबतचा अहवाल रेल्वे मंडळाला सादर करून राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यावर या दुहेरीकरणाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.