'आपल्या देशात औरंगजेबासारखे शासक हिरो बनू शकत नाहीत'; राजनाथ सिंह यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाम विधान
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर येथील कॅनॉट उद्यानात करण्यात आले. सुमारे एक कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या या भव्य स्मारकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
महाराणा प्रताप हे शौर्य, स्वाभिमान आणि एकतेचे प्रतीक
या सोहळ्यात बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्याची महती सांगितली. ते म्हणाले की, "महाराणा प्रताप हे केवळ योद्धे नव्हते, तर आदर्श नेतृत्व, स्वाभिमान आणि समाज एकतेचे प्रतीक होते. त्यांनी गवताची भाकर खाल्ली, पण सन्मानाशी तडजोड केली नाही. त्यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले."
राजनाथ सिंह यांनी पुढे म्हणाले की, "महाराणा प्रताप यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे मूल्यांकन आजपर्यंत जसे व्हायला हवे होते, तसे झाले नाही. इतिहासाच्या नावाखाली अनेक वेळा खोटा आणि विकृत दृष्टिकोन मांडला गेला. आमची नैतिक जबाबदारी आहे की, भविष्यातील पिढ्यांना खरं आणि प्रेरणादायी इतिहास समजावून सांगावा."
"औरंगजेबाचे महिमामंडन केले गेले"
यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या महिमामंडनावर तीव्र शब्दांत टीका केली. "औरंगजेब हा वीरपुरुष नव्हता. आम्ही औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले, तर त्यात चुकीचे काय? आपल्या देशात आणि शौर्य परंपरेत औरंगजेबासारखे शासक हिरो बनू शकत नाहीत," असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
"धर्मनिरपेक्षतेचा आदर्श म्हणजे महाराणा आणि शिवराय"
राजनाथ सिंह यांनी धर्माच्या आधारावर राज्य न केल्याचे उदाहरण देताना सांगितले की, "शिवाजी महाराजांचे अंगरक्षकांपैकी एक मुस्लिम होता. शिवाजी महाराजांनी स्वतः महाराणा प्रताप यांचे चित्र तयार केले होते. आमचे आदर्श मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते, उलट ते सर्व धर्मांचा सन्मान करणारे होते."