NDA women Cadets : एनडीएतील ऐतिहासिक टप्पा, पुण्यात 148 व्या कोर्समध्ये पहिल्या महिला कॅडेट्सचा दीक्षांत समारंभ
भारतीय लष्करी इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. गुरुवारी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे 148 व्या पासिंग आऊट परेडमध्ये पहिल्या महिला कॅडेट्सच्या तुकडीने पदवीप्राप्ती केली. त्यांनी पुरुष कॅडेट्ससोबत खांद्याला खांदा लावत तीन वर्षांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. या ऐतिहासिक बॅचमध्ये हरियाणातील हरसिमरन कौर हिने भाग घेतला होता. ती सेवानिवृत्त हवालदाराची मुलगी आहे. तिच्यासह 16 इतर महिला कॅडेट्सनी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून पदार्पण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. एनडीएने महिलांसाठी प्रवेश 2022 मध्ये सुरू केला होता. याआधी ऑगस्ट 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता, ज्यामध्ये महिलांना युपीएससीमार्फत होणाऱ्या एनडीए परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली. या निर्णयानंतर एनडीएने पहिल्यांदाच महिला उमेदवारांसाठी दरवाजे खुले केले.
एनडीएचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी दीक्षांत समारंभात बोलताना महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि आशा व्यक्त केली की या महिला अधिकारी आपल्या क्षेत्रात उत्तम नेतृत्व सिध्द करतील. या समारंभात एकूण 339 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून (JNU) पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 84 जणांनी विज्ञान शाखेतील पदवी, 85 जणांनी संगणकशास्त्रात, 59 जणांनी कला शाखेत तर 111 जणांनी अभियांत्रिकी शाखेतील पदवी संपादन केली. एनडीएच्या अधिकाऱ्यांनुसार महिला आणि पुरुष कॅडेट्सचे प्रशिक्षण जवळपास सारखेच होते. शारीरिक तंदुरुस्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर देण्यात आला. अधिकारीसदृश गुण (OLQs) तयार करणे हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते.
हरसिमरनने सांगितले की तिच्या कुटुंबातील लष्करी परंपरेमुळे ती लवकर सैनिकी क्षेत्रात यायला प्रेरित झाली. “माझे वडील आणि आजोबा दोघेही लष्करात होते. एनडीएमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकायला मिळाले,” असे ती म्हणाली. श्रुती दक्ष ही आणखी एक कॅडेट, जिचा कल तोफखान्याकडे आहे, ती देहराडूनमधील इंडियन मिलिटरी अकादमीत सामील होणार आहे. “माझे वडील एनडीएचे माजी विद्यार्थी असून त्यांनी हवाई दलातून निवृत्ती घेतली आहे. आमच्या कुटुंबात देशसेवा हीच परंपरा आहे. पुरुष कॅडेट्ससोबत आम्ही एकत्रच प्रशिक्षण घेतले. त्या अनुभवातून सख्य, जिद्द आणि आत्मविश्वास वाढला,” असे ती म्हणाली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे एनडीएने केवळ लिंग समानतेचा स्वीकार केला नाही. तर भारतीय संरक्षण दलांसाठी अधिक समावेशक आणि सक्षम अधिकारी वर्ग घडवण्याचा मार्गही खुला केला आहे.