Maharana Pratap Statue : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण
छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा ऐतिहासिक क्षण 18 एप्रिल रोजी साक्षीला येणार आहे. स्वराज्य व स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, भारतीय संस्कृती, शौर्य आणि परंपरेचे दर्शन घडवणारा अभूतपूर्व प्रसंग ठरणार आहे.
साधारण, 90 लाख रुपये खर्च करून उभारलेला हा 16 फूट उंचीचा पुतळा छत्रपती संभाजीनगरमधील कॅनॉट गार्डन येथे उभा करण्यात आला आहे. या कार्यामागे खासदार डॉ. भागवत कराड यांचा विशेष पुढाकार असून, त्यांनी हा उपक्रम साकारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानचे राज्यपाल, तसेच राज्य व केंद्र सरकारमधील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष माहितीपट, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे होणार आहेत. शहरातील नागरिकांसाठी हे एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी पर्व ठरणार आहे.
महाराणा प्रताप : शौर्य, त्याग आणि आत्मसन्मानाचा प्रेरणास्तंभ
महाराणा प्रताप हे केवळ मेवाडचे शासक नव्हते, तर ते स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि अडगळीच्या काळात न झुकणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक होते. हल्दीघाटीच्या युद्धात त्यांनी प्रचंड संघर्ष करून आपला स्वाभिमान अबाधित ठेवला. त्यांच्या कार्याने आजही लाखो तरुणांच्या मनात प्रेरणेचे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने नव्या पिढीला त्यांच्या जीवनकार्याचा परिचय होईल, आणि राष्ट्रनिष्ठा, स्वराज्य व स्वाभिमानाचे महत्व नव्याने अधोरेखित होईल.
शहरासाठी अभिमानाचा क्षण
या भव्य पुतळ्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून, हा परिसर भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. शहरातील नागरिकांनी आणि युवकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.