"लबाडांनो, पाणी द्या!"; मुंडावळ्या बांधून नवरदेव थेट ठाकरेंच्या आंदोलनात

"लबाडांनो, पाणी द्या!"; मुंडावळ्या बांधून नवरदेव थेट ठाकरेंच्या आंदोलनात

लग्नासाठी सजलेला नवरदेव आपल्या लग्नाच्या मांडवात जाण्याआधी थेट पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला.
Published by :
lokshahi news
Published on

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न आता लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील परिणाम करू लागला आहे. याचे जीवंत उदाहरण आज शहरात पाहायला मिळाले, जेव्हा लग्नासाठी सजलेला नवरदेव आपल्या लग्नाच्या मांडवात जाण्याआधी थेट पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला.

नवरदेवाच्या गाडीला ब्रेकडाऊन, पण जोश कायम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शहरात सुरू असलेल्या 'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनाच्या ठिकाणी हा प्रकार घडला. लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाची गाडी रस्त्यात अचानक बंद पडली. हे लक्षात येताच, आंदोलनस्थळी असलेल्या शिवसेना नेत्यांनी त्याला काही वेळ आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली. विशेष बाब म्हणजे, नवरदेवाने एकही क्षण न दवडता थेट आंदोलनात उडी घेतली.

"माझं लग्न आहे, पण पाणी नसेल तर कसं जगायचं? पाणी नसल्यामुळेच उशीर झालाय...आता माझी नवरी वाट बघतेय, पण मी आधी पाण्याच्या लढ्याला प्राधान्य देतो", असे भावनिक उद्गार या नवरदेवाने काढले. त्याच्या या भूमिकेचं आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं.

पाण्यावाचून लग्नही थांबतंय!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे. यामुळे फक्त शेती आणि घरगुती गरजाच नव्हे, तर सामाजिक घडामोडींवरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये तर मुलगी देताना "गावात पाणी आहे का?" हा ठराविक प्रश्न विचारला जातो. "पाणी असेल तरच मुलगी देऊ," असं आता पालक सरळपणे सांगत आहेत. ही स्थिती अत्यंत गंभीर असून समाजाच्या मुलभूत गरजांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

"लबाडांनो, पाणी द्या!", आंदोलनात संतापाचा उद्रेक

छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी शहराच्या विविध भागात आंदोलनं केली. शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने "लबाडांनो, पाणी द्या!", या घोषणेने आंदोलनाची दिशा ठरवली. आंदोलकांनी यावेळी सांगितले की, "सरकारने लोकांना पाण्याच्या प्रतीक्षा रांगेत उभं केलंय. लग्न होण्यासाठी पाण्याचं प्रमाणपत्र लागतंय, ही शोकांतिका आहे. नवरदेव आंदोलनात उतरलाय, ही गोष्ट सरकारच्या संवेदन शून्यतेचं ताजं उदाहरण आहे."

प्रशासनाच्या दुर्लक्षावर सवाल

या आंदोलनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की प्रशासन आणि शासनाच्या उदासीन धोरणांमुळे सामान्य नागरिकांचे जीवन कठीण बनले आहे. रोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, आणि आता तर लोकांचे वैवाहिक निर्णयही पाण्यावर अवलंबून झाले आहेत. "हे सरकार झोपलंय का? पाणी देऊ शकत नाहीत ?" असे सवाल स्थानिक नागरिक आणि आंदोलक विचारत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com