Thane to Navi Mumbai Elevated Road : ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका! ठाणे ते नवी मुंबई विमानतळासाठी एलिव्हेटेड मार्गाला परवानगी; आता प्रवास 'इतक्या' मिनिटांवर
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी होणार असून, ठाणे आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा एलिव्हेटेड रस्ता आता मंजूर करण्यात आला आहे. सिडकोने तयार केलेल्या या प्रकल्पानुसार, ठाणे ते विमानतळ 26 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग उभारला जाईल. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास 45 मिनिटांत पूर्ण होईल.
सध्या, ठाणे-बेलापूर रोड आणि पाम बीच रोड या दोन्ही मार्गांवर वाहतूक जास्त असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अटल सेतू नवी मुंबईला जोडलेला असला तरी ठाण्याशी थेट कनेक्शन नाही, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता होती. यासाठी एलिव्हेटेड रस्ता मंजूर करण्यात आला.
एलिव्हेटेड मार्ग ठाण्यातील पटणी मैदानापासून सुरू होऊन, 17 किलोमीटरपर्यंत वाशीपर्यंत वळण घेत नऊ किलोमीटरचा दुमजली रस्ता विमानतळापर्यंत जाईल. या प्रकल्पाची एकूण किंमत 8 हजार कोटी रुपये असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. तसेच, औद्योगिक क्षेत्राला जलद दळणवळणाचा फायदा होईल.