Vidarbha Rain Update : विदर्भामध्ये गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

Vidarbha Rain Update : विदर्भामध्ये गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज

नागपूरसह विदर्भासाठी पुढील तीन तास अतिमहत्त्वाचे असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

नागपूरमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. बुधवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर सकाळी काही काळ कमी होता मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत नागपूरकरांना झोडपून काढले. नागपूरसह विदर्भासाठी पुढील तीन तास अतिमहत्त्वाचे असून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

वेळेआधीच महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय झाला असला तरी गेल्या आठवडाभर नागपूर आणि विदर्भात पावसाने दडी मारली होती. मात्र बुधवारी रात्रीपासुन पावसाने विदर्भासह नागपूरमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शहरातील तापमानात घट झाली असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे नागपूर विदर्भातील पीकपेरणीला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मात्र पुढचे तीन तास अतिमहत्त्वाचे असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com