BMC Election : एक Marker, अनेक प्रश्न! मतदानानंतर बोटची शाई दिसतच नाही, Viral Video
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर लावलेली खूण काही वेळातच पुसली जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असून अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. मात्र, सुरुवातीच्या तासांतच काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कुठे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, तर कुठे मतदारांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या.
यातच आणखी गंभीर मुद्दा पुढे आला आहे. यंदा निवडणूक आयोगाने बोटावर कायमची शाई न लावता पेनसारख्या साधनाने खूण करण्याचा प्रयोग केला आहे. पण ही खूण साध्या रिमुव्हरने सहज काढता येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दुबार मतदानाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकारावर अनेक राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्वतःचा व्हिडिओ शेअर करत बोटावरील खूण कशी पुसली जाते, हे दाखवून दिले. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्या घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी विविध पक्षांकडून केली जात आहे. आता आयोग काय भूमिका घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
• महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सकाळपासून सुरू
• मतदारांच्या बोटावर लावलेली खूण काही वेळातच पुसली जात असल्याचे व्हायरल व्हिडिओ
• राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान सुरू, नागरिकांची चांगली गर्दी
• सुरुवातीच्या तासांत काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती
• काही ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
• काही मतदारांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी

