Supriya Sule : नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर गडकरींचं आश्वासन
बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर गाजला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा गंभीर प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी वारंवार होणाऱ्या भीषण दुर्घटनांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या धक्कादायक अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या परिसरातील सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
सुप्रिया सुळे यांची लोकसभेत ठाम मागणी
कोल्हापूर–पुणे मार्गावरील नऱ्हे आणि नवले पुल परिसरातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याकडे लक्ष वेधताना सुळे म्हणाल्या, “दिल्लीतून तज्ज्ञ पथक पाठवूनही दुर्घटना कमी झाल्या नाहीत. कंत्राटदाराला काळ्या यादीतही टाकलं, पण कामाची गती वाढत नाही. अखेर ‘झिरो अॅक्सिडेंट झोन’ हा मॉडेल नऱ्हे परिसरात कधी लागू होणार?” असा थेट प्रश्न त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केला. त्या पुढे म्हणाल्या की, नऱ्हे आणि नवले पुलाजवळील रस्त्याची रचना, वाहतूक कोंडी, उतार, वेगवान वाहनांची धडक, आणि ब्रेक फेल सारखे प्रकार सातत्याने जीवितहानी घडवत आहेत. नागरिकांच्या जीवाची सुरक्षितता हा सरकारचा प्राथमिक मुद्दा असायला हवा, असे मतही त्यांनी स्पष्टपणे मांडले.
गडकरींची महत्त्वपूर्ण माहिती आणि आश्वासन
खासदार सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गावरील सध्याची स्थिती, अडचणी आणि सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. गडकरी म्हणाले, “पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग हा देशातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पुणे–सातारा हा टप्पा पूर्वी रिलायन्सकडे होता, मात्र कामात झालेल्या विलंबामुळे त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. तसेच त्यांनी सांगितले की, या मार्गासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे. पुणे वेस्टर्न बायपाससंदर्भातील काम प्रगतीपथावर आहे.सहा हजार कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर झाला आहे खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम सुरू असून, सातारा–कोल्हापूर टप्प्यातील अडथळे दूर करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे.गडकरी यांनी विशेषत्वाने आश्वासन दिले की, “एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करून मार्गावरील सर्व तांत्रिक अडथळे दूर करणारे काम पूर्ण होईल.”
नवले पुलाजवळील भीषण दुर्घटना, ८ जणांचा मृत्यू
काही आठवड्यांपूर्वी नवले पुलाजवळ घडलेल्या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या अवजड कंटेनरचे ब्रेक नवले पुलावर अचानक फेल झाले. नियंत्रण सुटलेल्या कंटेनरने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. दोन वाहनांना भीषण आग लागली आणि अनेक वाहनचालकांना पसार होण्यासाठी क्षणभरही वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले.
नवले पुल हा गेल्या काही वर्षांत अपघातांचे केंद्र बनले असून रस्ते डिझाईन, वेगमर्यादा, उतार आणि वाहतूक नियोजनातील अनेक त्रुटी वारंवार जीवितहानीस कारणीभूत ठरत आहेत. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अपघातमुक्त नवले पुलाकडे अपेक्षा
नवले पुल परिसरातील अपघात रोखण्यासाठी नागरिक, स्थानिक संस्था, रस्ते सुरक्षा तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. आता हा प्रश्न लोकसभेत उठत असून केंद्रीय मंत्री स्वतः त्यावर उत्तर देत असल्याने या भागातील उपाययोजना गतिमान होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकीकडे रस्त्याच्या डिझाईनमधील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असताना, दुसरीकडे स्थानिक प्रशासनानेही वाहतूक शिस्त, वेगमर्यादांचे पालन आणि तातडीने सेफ्टी बॅरियर्स बसवण्याची गरज व्यक्त केली आहे.
