Mumbai BEST Election Results : ठाकरे बंधुनी ही संधी देखील गमावली! बेस्ट पतपेढी निवडणुकीत एकही जागा नाही
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत यंदा मोठे उलटफेर झाले आहेत. ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. तर शशांक राव यांच्या पॅनेलने सर्वाधिक 14 जागा पटकावत आपली ताकद सिद्ध केली. महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलने 7 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले, तर उत्कर्ष पॅनेलने 0 जागा मिळवल्या.
या निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. मुसळधार पावसामुळे मतमोजणीस विलंब झाला आणि अखेर मंगळवारी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला. एकूण 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत निकाल स्पष्टपणे तीन गटांमध्ये विभागला गेला. शिवसेना आणि मनसेने मिळून उत्कर्ष पॅनेल उभं केलं होतं. मात्र, नऊ वर्षांपासून असलेला त्यांचा प्रभाव या निवडणुकीत कोसळला. दुसरीकडे, महायुतीने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील सहकार समृद्धी पॅनेल उभं करून ताकद दाखवली.
शशांक राव पॅनेलला बेस्ट वर्कर्स युनियनचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना मोठा फायदा झाला. भाजप नेते प्रसाद लाड यांनी निकालानंतर लगेचच ट्वीट करून आपला आनंद साजरा केला. "ब्रॅण्डचे मालक एकही जागा जिंकू शकले नाहीत, त्यांना जागा दाखवली" अशी टिका करत त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. या पराभवानंतर शिवसेना व मनसेच्या पुढील राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.