Mumbai Municipal Election : शिवसेनेचा गड तुटणार की इतिहास कायम? २०१७ ची कडवी लढत आठवतेय?

Mumbai Municipal Election : शिवसेनेचा गड तुटणार की इतिहास कायम? २०१७ ची कडवी लढत आठवतेय?

मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे केवळ महानगरपालिकेचा कारभार नाही, तर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे केवळ महानगरपालिकेचा कारभार नाही, तर राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. १५ जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होत असून, मुंबई महापालिका अखेर कोणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

१९८५ सालापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. जवळपास चार दशकांपासून शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत हा गड पहिल्यांदाच गंभीररीत्या हादरला. त्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेला कडवी झुंज दिली होती. शिवसेनेला ८४, तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या होत्या. २२७ जागांच्या सभागृहात कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे अखेर दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागली आणि भाजपाने शिवसेनेला महापौरपद राखून देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडले. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली, शिवसेनेत फूट पडली आणि राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. याच पार्श्वभूमीवर यंदाची मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भाजपा आता शिवसेनेचा हा पारंपरिक गड भेदून मुंबईत आपला पहिला महापौर बसवण्याचे स्वप्न उघडपणे पाहत आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. काँग्रेसने ३१ जागांवर विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला ९, मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाने ६ जागा जिंकल्या होत्या, तर एआयएमआयएमला २ जागांवर समाधान मानावे लागले होते. अपक्ष उमेदवारांनीही ६ जागांवर विजय मिळवला होता.

यंदाच्या निवडणुकीत मुंबईतील २२७ जागांसाठी एकूण १,७२९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शहरात एकूण १,०३,४४,३१५ पात्र मतदार असून, त्यामध्ये ५५,१६,७०७ पुरुष, ४८,२६,५०९ महिला आणि १,०७७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. आज जाहीर होणाऱ्या निकालातून मुंबईचा पुढील महापौर कोणत्या पक्षाचा असेल, आणि मुंबईच्या सत्तासमीकरणात कोणता नवा अध्याय लिहिला जाणार, हे स्पष्ट होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com