Maharashtra Weather Update : पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! हवामान विभागाचा रेड अलर्ट इशारा; नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
बंगालच्या उपसागरात तसेच दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापैकी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाला काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता असली तरी हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्येही पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा या राज्यांना हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाचा जोर राहणार आहे.
महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पाऊस चांगलाच सक्रिय राहणार आहे. कोकण आणि विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, आजही राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचा जोर कायम राहील. राज्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.