Rohit Pawar : “पैसा लोकांचा आहे, माज दाखवू नका”; जामखेड्यांच्या आमसभेत रोहित पवारांचा संताप
Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार नागरिकांच्या तक्रारी ऐकताना एका अधिकाऱ्यावर संतापले. “हा पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नका” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे, तर नागरिकांचा मात्र पवारांना पाठिंबा दिसून आला.
गुरुवारी कर्जत येथे आणि शुक्रवारी जामखेड येथे सलग तासन्तास आमसभांचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत येथे तब्बल आठ तास तर जामखेड येथे दुपारी 12'ते संध्याकाळी 7 या वेळेत पवारांनी नागरिकांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेतल्या. प्रांताधिकारी, बीडीओ, नायब तहसीलदार यांसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
ड्रेनेज कामावरून झाला वाद
जामखेडमध्ये एका चेंबर-ड्रेनेज लाईनच्या कामावरून नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार केली. अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. तक्रारीवर अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिसादावर रोहित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याला झापले.
“हे लोक खोटं बोलत आहेत का? हे तुमच्या घरचं काम आहे का? लोकांच्या पैशातून ही कामं केली जात आहेत. त्याचा दर्जा चांगला हवा. खिश्यातून हात काढा, लोकांना वेठीस धरू नका,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
विरोधक-समर्थक यांच्या प्रतिक्रिया
या प्रसंगानंतर विरोधकांनी पवारांवर टीका केली. “लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामासाठी आवाज उठवणं अपेक्षित आहे. पण सरकारी अधिकाऱ्याशी अशा भाषेत बोलणं योग्य नाही,” असा विरोधकांचा आरोप आहे. मात्र नागरिकांनी पवारांचे समर्थन केले. “काही अधिकारी वेळेत काम करत नाहीत. त्यामुळे आमदारांनी कडक शब्दांत सुनावलं, ते योग्यच आहे. अधिकाऱ्यांना अशाच भाषेत समजतात,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
रोहित पवारांनी सभेत अनेक प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश दिले. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आमसभेमुळे अनेक तक्रारींचे त्वरित निराकरण झाले.