PM Modi : “हे अधिवेशन विजयी भारताचे प्रतीक”- पीएम मोदी
21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन; 18 दिवस होणार कामकाज, 15 पेक्षा अधिक विधेयकांची मांडणी अपेक्षित
आजपासून देशाच्या संसदेत पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभ झाला असून, अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने अवघ्या 22 मिनिटांत दहशतवाद्यांच्या तळांवर यशस्वी कारवाई केली आणि देशाची सामरिक क्षमता जगासमोर सिध्द केली. मेड इन इंडिया शस्त्रास्त्रांमुळे आत्मनिर्भरतेचे नवे रूप जगापुढे आले आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, देशाच्या अंतराळ मोहिमेतही आपण मोठे यश संपादन करत आहोत. अंतराळवीर शुभांशू यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) भारताचा ध्वज फडकावल्याचा उल्लेख करत मोदींनी तो भारतासाठी गौरवाचा क्षण असल्याचे सांगितले.
जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची घोडदौड
पंतप्रधान मोदींनी आर्थिक प्रगतीचाही उल्लेख केला. “2014 पूर्वी आपला क्रमांक दहावा होता. आता आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी 25 कोटी नागरिक गरिबीच्या सीमारेषेच्या बाहेर पडल्याचेही नमूद केले.
अधिवेशनाची रचना आणि महत्त्वाची विधेयके
या अधिवेशनात एकूण 32 दिवसांच्या कालावधीत 18 कामकाजाचे दिवस असतील, आणि 15 हून अधिक विधेयके मांडली जातील. त्यात केंद्र सरकार 8 नवीन विधेयके सादर करणार असून, 7 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या विधेयकांमध्ये मणिपूर जीएसटी सुधारणा विधेयक, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि नवीन आयकर विधेयक यांचा समावेश आहे. नव्या आयकर विधेयकासाठी तयार करण्यात आलेल्या संसदीय समितीचा अहवाल पहिल्याच दिवशी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. या अहवालात 285 शिफारशी दिल्या गेल्या असून हे विधेयक सध्याच्या 1961 च्या जुन्या कायद्याला पुनर्स्थित करेल.