Maharashtra Politics : मुंबई महापौर पदाचा तिढा सुटला, महायुतीत एकमत

Maharashtra Politics : मुंबई महापौर पदाचा तिढा सुटला, महायुतीत एकमत

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत ‘अश्वमेध’ उधळला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत ‘अश्वमेध’ उधळला आहे. या निवडणुकांमध्ये किमान २३ महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला असून, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विशेषतः आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.

मुंबई महानगरपालिकेतील महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबईचे महापौरपद केवळ प्रशासकीयच नव्हे तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत मानाचे मानले जाते. याआधी सलग २५ वर्षे उद्धव ठाकरे यांच्या अविभक्त शिवसेनेचा महापौर मुंबईत विराजमान होता. मात्र, यावेळी चित्र बदलले असून महायुती सत्तेच्या उंबरठ्यावर उभी आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ नगरसेवकांना अचानक वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलमध्ये हलवल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. या हालचालींमुळे महापौरपदाबाबतचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर मुंबईतील अंतर्गत वाद मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईशेजारील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही सत्ता स्थापनेबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यासंदर्भात गुप्त बैठक झाली. या बैठकीत कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेवर सविस्तर चर्चा झाली.

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपला ५१ तर शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या असून, दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.

उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. येथे भाजपला ३८ तर शिवसेनेला ३६ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना स्थानिक आघाडीसोबत लढली असली तरी येथेही सरकार स्थापण्याचा निर्णय झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राज्यातील शहरी सत्ताकेंद्रांवर महायुतीची पकड अधिक मजबूत होताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com