NISAR Mission : आज अवकाशात 'NISAR'ची झेप! भारत-अमेरिका संयुक्त मोहिमेचा नवा टप्पा; जाणून घ्या सविस्तर
आज (30 जुलै) सायंकाळी 5.40 वाजता श्रीहरिकोटा येथून भारत आणि अमेरिका या दोन देशांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या NISAR या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या भूभाग, बर्फाच्छादित भाग आणि परिसंस्थांचा सखोल अभ्यास करणार आहे. NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar — जो एक अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ भारतीय अंतराळ संस्था (ISRO) आणि अमेरिकन संस्था (NASA) यांनी एकत्र काम करत ही यंत्रणा विकसित केली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण स्थळावरून GSLV-F16 या रॉकेटच्या साहाय्याने संध्याकाळी 5.40 वाजता प्रक्षेपण करण्यात येईल. यासाठी उलटी गणना काल (29 जुलै) दुपारी 2.10 वाजता सुरू झाली होती. NISAR चं वजन सुमारे 2,400 किलो असून त्याचं कार्यकाल 5 वर्षांचं असेल.
यामध्ये ISRO ने उपग्रहाचं मुख्य संरचनात्मक भाग व प्रक्षेपण व्यवस्था तयार केली असून, NASA कडून L-बँड रडार, GPS रिसीव्हर आणि डेटा ट्रान्समिशन यंत्रणा पुरवण्यात आली आहे. हा उपग्रह हिमालय, अंटार्क्टिका आणि उत्तर-दक्षिण ध्रुवांसह जंगल क्षेत्रांमधील ऋतूनुसार होणारे बदल, भूगर्भीय हालचाली, हिमनद्यांची गती, आणि महासागर किनाऱ्यांवरील परिस्थिती यांचं निरीक्षण करणार आहे. या डेटाचा उपयोग पर्यावरण शास्त्रज्ञ, हवामान संशोधक आणि धोरण निर्मात्यांना होणार आहे.
प्रक्षेपणानंतर सुरुवातीचे 90 दिवस हे ‘कमिशनिंग फेज’ म्हणून ओळखले जातील, ज्यामध्ये उपग्रहाची यंत्रणा कार्यक्षम आहे की नाही याची चाचणी होईल. त्यानंतर शास्त्रीय अभ्यासासाठी तो पूर्णपणे कार्यरत होईल. ही मोहीम भारत आणि अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थांमधील सहकार्याचा उत्तम नमुना आहे. ISRO प्रक्षेपण आणि नियंत्रण प्रणाली हाताळत आहे, तर NASA कडून रडारची कार्यपद्धती आणि कक्षानियंत्रण दिलं जात आहे. उपग्रहाचा डेटा दोन्ही संस्थांच्या ग्राउंड स्टेशनवर प्राप्त होईल व प्रक्रिया करून जागतिक वैज्ञानिक समुदायासाठी खुला केला जाईल.