Kolhapur Ambabai Temple : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद! मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीवर रासायनिक संरक्षण प्रक्रिया करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विनंतीनंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तीची नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन करण्यात येणार असून, यासाठी 11 आणि 12 ऑगस्ट 2025 हे दोन दिवस निश्चित केले आहेत.
या प्रक्रिये दरम्यान भाविकांना मूळ मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन मिळणार नसले तरी, गैरसोय टाळण्यासाठी पितळी उंबऱ्याच्या आत उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना बाहेरूनच दर्शन घेता येईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे व देवस्थान समितीने वेळोवेळी पुरातत्त्व विभागाकडे पाहणीसाठी विनंती केली होती.
मागील वर्षी 16 एप्रिल 2024 रोजी अशीच संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. यावर्षी जून महिन्यात समितीने पुन्हा तातडीच्या कारवाईसाठी पत्र दिले होते. संवर्धन प्रक्रियेत तज्ज्ञ पथक मूर्तीवरील नैसर्गिक झीज, धूळ व इतर घटक तपासून योग्य रासायनिक उपाययोजना करेल. यामुळे मूळ प्रतिमेचे दीर्घकालीन संरक्षण होणार आहे. देवस्थान समितीने सर्व भक्तांना संयम राखण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया इतर ऐतिहासिक मंदिरांप्रमाणेच नियमित तपासणी व जतनाचा भाग आहे. मूर्तीला कोणतीही हानी पोहोचलेली नसून ती पूर्णपणे सुस्थितीत आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता निश्चिंत राहावे, असेही त्यांनी सांगितले.