Byculla Ranichi baug : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! राणीच्या बागेतील येत्या काळात पेंग्विन्स पाहता येणार नाहीत; जाणून घ्या कारण

Byculla Ranichi baug : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! राणीच्या बागेतील येत्या काळात पेंग्विन्स पाहता येणार नाहीत; जाणून घ्या कारण

मुंबईतील भायखळा येथील राणीच्या बागेत पेंग्विनसाठी हजेरी लावणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या नव्या वर्षात तब्बल दोन महिन्यांसाठी पेंग्विन कक्ष बंद राहणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे विविध प्राण्यांमुळे आकर्षण ठरलेलं आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे वाघ आणि पेंग्विन तसेच इतर प्राणी. या प्राण्यांना बघायला लोक दुरदुरहून येतात. मात्र आता राणीच्या बागेत पेंग्विनसाठी हजेरी लावणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

येत्या नव्या वर्षात तब्बल दोन महिन्यांसाठी पेंग्विन कक्ष बंद राहणार आहे. सध्या या कक्षाची 1,800 चौरस फूट जागा आहे, ती आता 800 चौरस फूटांनी वाढवली जाणार आहे. याठिकाणी पेंग्विन विभागात 25 पेंग्विन ठेवण्याची क्षमता आहे आणि सध्या 21 पेंग्विन येथे आहेत. मुंबई महापालिका पेंग्विनसाठी असलेल्या जागेचा विस्तार करणार आहे. त्यामुळे भविष्यात 10 ते 15 पेंग्विन याठिकाणी अधिक ठेवता येतील.

सध्या जागेचा विस्तार करणार असल्यामुळे पेंग्विन्सला तात्पुरते त्यांच्या क्वारंटाईन विभागात हलवण्यात येणार आहे. दरम्यान काम पूर्ण होईपर्यंत म्हणजेच सुमारे दोन महिने प्रदर्शन बंद राहील. हा विस्तार सध्या बांधण्यात येणाऱ्या नवीन मत्स्यालय प्रकल्पाचा भाग आहे. सध्या पेंग्विन कक्षात थंडावा राखण्यासाठी यंत्रणा, पाण्याची स्वच्छता राखणारे सिस्टीम, 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच डॉक्टर, प्राणीपालक आणि अभियंते अशी सर्व सोय आहे.

26 जुलै 2016 रोजी दक्षिण कोरियातील सियोल येथून पहिल्यांदा 3 नर आणि 5 मादी पेंग्विन मुंबईत आणले गेले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “या विस्तारामुळे पेंग्विनना अधिक जागा, सुरक्षितता आणि आरामदायी वातावरण मिळणार आहे. नवीन मत्स्यालय आणि पेंग्विन विभाग एकत्र आल्यामुळे पर्यटकांचा अनुभव अधिक आकर्षक होईल.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com