SCO Summit 2025 : आंतरराष्ट्रीय राजकारणात नवं त्रिकूट! भारताची रणनीती ठरली चर्चेचा विषय; अमेरिकेला फुटला घाम

SCO Summit 2025 : आंतरराष्ट्रीय राजकारणात नवं त्रिकूट! भारताची रणनीती ठरली चर्चेचा विषय; अमेरिकेला फुटला घाम

तिआनजिन येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची उपस्थिती विशेष ठरली.
Published by :
Team Lokshahi
Published on

तिआनजिन येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची उपस्थिती विशेष ठरली. या तिघांच्या एकत्रित मंचामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या धुरीची छटा दिसली आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ वाढवलेल्या पार्श्वभूमीवर ही परिषद भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

मोदींच्या द्विपक्षीय बैठकींनी या दौऱ्याचे महत्त्व अधिक अधोरेखित केले. पुतिन यांच्यासोबत जवळपास 50 मिनिटांची चर्चा झाली तसेच दोन्ही नेत्यांनी एका कारमध्ये प्रवास करून मैत्रीचे नवे प्रतीक निर्माण केले. त्याचबरोबर डिसेंबर 2025 मध्ये पुतिन भारत दौऱ्यावर येणार असल्याची घोषणा करण्यात आली. याशिवाय मोदी-जिनपिंग चर्चेत भारत-चीन थेट हवाईसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

या शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. संयुक्त निवेदनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला, जे याआधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानचे पंतप्रधान उपस्थित असतानाही मोदींनी "दहशतवादावर दुहेरी मापदंड स्वीकारले जाणार नाहीत" असा स्पष्ट संदेश दिला. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे राजनैतिक वजन अधिक ठळक झाले.

पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेत रशिया-युक्रेन युद्धाचाही मुद्दा पुढे आला. मोदींनी या संघर्षाच्या त्वरित समाप्तीची आणि शाश्वत शांततेची गरज अधोरेखित केली. यापूर्वीच त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींसोबत संवाद साधल्याचे नमूद केले. त्यामुळे भारताने शांतीचे प्रवक्ते म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत केली.

या परिषदेच्या निमित्ताने भारताला पाच मोठे फायदे मिळाले पुतिन यांचा भारत दौरा निश्चित झाला, भारत-चीन हवाईसेवा पुन्हा सुरू होण्याची दिशा मिळाली, दहशतवादाविरोधी ठोस भूमिका जागतिक स्तरावर नोंदवली गेली, मोदी-पुतिन यांचा कार प्रवास मैत्रीचे प्रतीक ठरला आणि भारत-रशिया-चीन नवे समीकरण जगासमोर आले. त्यामुळे भारताच्या राजनैतिक ताकदीचा ठसा अधिक गडद झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com