Ajit Pawar : पुण्यात गुन्हेगारी राजकारणाचा उदय? राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आंदेकर आणि मारणे कुटुंबांना उमेदवारी
पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून, शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप-शिवसेना युती होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवारी घोषणांनी मोठी खळबळ उडवली आहे. विशेषतः गुन्हेगारी विश्वाशी संबंधित नावांची उमेदवारी जाहीर झाल्याने पुण्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज एबी फॉर्मच्या वाटपानंतर झाली. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आंदेकर कुटुंब कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबत मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीने ही घोषणा करून सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला.
याचवेळी, प्रभाग क्रमांक १० मधून जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी असून, त्या थेट महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. गजा मारणे सध्या तुरुंगात असतानाही त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय आणि सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घडामोडींमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. “राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोसत आहेत का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. अनेक निष्ठावंत आणि स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते बाजूला सारले जात असताना, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांना उमेदवारी दिली जात असल्याची भावना जनमानसात बळावत आहे. महापालिका निवडणूक ही शहराच्या विकासासाठी महत्त्वाची असते. मात्र, अशा उमेदवारीमुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी काळात याचा मतदानावर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
