MVA- MNS Morcha : मनसे-मविआच्या ‘सत्या मोर्चा’चा मार्ग ठरला! वेळ, ठिकाण अन् सहभागी कोण? जाणून घ्या...
मतदारयादीतील कथित घोळांविरोधात महाविकास आघाडी (मविआ) १ नोव्हेंबर रोजी मुंबईत ‘सत्या मोर्चा’ काढणार आहे. या मोर्चात मनसे आणि डावे पक्षही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा दुपारी २ वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होऊन आझाद मैदानमार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाणार आहे.
मोर्चासाठी परवानगी मिळावी यासाठी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. भेटीनंतर खा. अरविंद सावंत यांनी मोर्चाला परवानगी मिळाल्याची माहिती दिली. कार्यकर्त्यांना मार्ग समजण्यासाठी क्यूआर कोड प्रसिद्ध केला जाणार आहे.
मोर्चापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३० ऑक्टोबरला वांद्रे येथील हॉटेल रंगशारदामध्ये मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीस सर्व विभाग आणि शाखा पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मविआने मतदारयादीतील त्रुटी दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली आहे. या मोर्चाद्वारे आघाडी सरकार आणि निवडणूक आयोगासमोर आपली भूमिका मांडणार आहे.


