Mumbai BEST Election Result : शशांक राव यांचा पॅनेल विजयी, ठाकरे बंधूंना मोठा धक्का; फडणवीसांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त, म्हणाले...
मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव पॅनेलने घवघवीत यश मिळवले असून, ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या निकालानुसार, 21 जागांपैकी 14 जागांवर शशांक राव यांच्या पॅनेलने विजय मिळवला, तर महायुती समर्थित सहकार समृद्धी पॅनेलला 7 जागा मिळाल्या. मात्र, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. या निकालामुळे ठाकरे पॅनेल पूर्णपणे कोसळले असून, कामगारांच्या विश्वासावर टिकणारे नेतृत्व कोणते, याचा स्पष्ट संदेश दिला गेला आहे.
"बँड अनेक असतात, पण जनतेचा पाठिंबा कामगारांसाठी काम करणाऱ्यालाच"
निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शशांक राव यांनी ठाकरे बंधूंना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, "बँड अनेक असतात. पण जो कामगार आणि जनतेच्या हिताचं काम करतो, तोच टिकतो. तुम्ही एकटे असाल तरी लोक तुम्हाला निवडून देतात. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीने हे पुन्हा दाखवून दिलं."
देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांचे आभार
यावेळी शशांक राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले. ते म्हणाले, "मी भाजपचा विचार मानणारा आहे. पण कामगार संघटनांचा हेतू एकच – कामगारांच्या हक्कांसाठी लढणं. त्यासाठी राजकीय मदतीची गरज असते. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी नेहमीच कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. त्याचा फायदा आम्हाला निश्चित झाला."
ठाकरे गटावर टीकास्त्र
शशांक राव यांनी यावेळी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "सामंत पैशांच्या वापराबद्दल बोलतात. पण ते स्वतः 9 वर्षे बेस्ट पतपेढीत आणि तब्बल 25 वर्षे बेस्ट समितीत होते. त्यावेळी कामगारांना निवृत्तीनंतर तीन वर्षे ग्रॅच्युईटी मिळाली नव्हती. कामगारांच्या ग्रॅच्युईटीचा पैसा ठेकेदारांना वाटण्यात आला. त्यामुळे सामंत यांनी इतरांवर आरोप करणं म्हणजे ढोंग आहे."
उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरही शशांक राव यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, "2017 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत विलीन करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मुख्यमंत्री झाल्यावर ते पाळलं नाही. शिवसेना महानगरपालिका आणि समितीवर असूनही बेस्टसाठी एकही बसगाडी विकत घेतली नाही. आमच्याकडे 2019 मध्ये एमओयू होता की बेस्टकडे 3337 स्वमालकीच्या बसगाड्या हव्यात. पण उलट 250 गाड्यांवर बेस्ट आणून ठाकरे फक्त कॉन्ट्रॅक्ट देत राहिले."
ठाकरे बंधूंचा पराभव : कामगारांमध्ये असंतोष?
उत्कर्ष पॅनेलचा पूर्ण पराभव झाल्यानंतर ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का मानला जातो. कामगारांच्या हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी अपेक्षित कामगिरी न केल्याचा फटका त्यांना बसल्याचे मानले जात आहे. याउलट, शशांक राव यांच्या पॅनेलने सातत्याने कामगारांच्या प्रश्नांना हात घालून संघटनात्मक ताकद निर्माण केली. त्यामुळेच कामगारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, असा विश्लेषकांचा सूर आहे.