MSRTC : ST च्या दरवाढीचा गणेशभक्तांना फटका; एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेत थेट 30 टक्क्यांची वाढ
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आता एसटी महामंडळाने प्रवाशांची निराशा केली आहे, एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी, एसटीच्या गट आरक्षणाच्या भाड्यामध्ये चक्क 30 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर असा निर्णय घेतला गेल्यामुळे कोकणवासीय नाराज आहेत. दरवर्षी गणपतीसाठी लाखो भाविक कोकणात जात असतात.
मात्र यंदा एसटीने प्रवास करणाऱ्या गणेश भक्तांना एसटीमधील दरवाढीचा मोठा फटका बसण्याची बातमी समोर येते आहे. यंदा एसटीच्या गट आरक्षणाच्या रकमेमध्ये मध्ये थेट 30 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाचा तोटा कमी व्हावा यादृष्टीने हा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्शवभूमीवर गट आरक्षण करणाऱ्या मंडळाकडून आंदोलन करण्याचा आता इशारा सुद्धा दिला जातो आहे. गट आरक्षणामध्ये एकूण 40 प्रवासी एका एसटीचे बुकिंग करतात.
गेल्या काही वर्षात रेल्वे आणि एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. मात्र आता गणपती बाप्पांचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना अचानक एसटी महामंडळाने असा निर्णय घेतल्यामुळे प्रवासी संतप्त झालेले आहेत. बसेसचा जो परतीचा प्रवास असतो हा रिकामीच असतो. त्यामुळे त्या प्रवासादरम्यानचा खर्च भरून निघावा यासाठी महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 100 रुपयाची तिकीट असणाऱ्या प्रवाशांना 130 रुपये मोजावे लागणार आहे.
यामुळे गट आरक्षण करणारे विविध ग्रुप संतप्त झाले आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा या लोकांकडून दिला जात आहे. येणाऱ्या काळात यामध्ये काही सकारात्मक बदल होतील का? गट आरक्षणाच्या किमतीमध्ये काही घट केली जाईल का याचा निर्णय येत्या दोन दिवसात लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे आहे.