Cold Wave : राज्यात हुडहुडी वाढली, दोन दिवसात महाराष्ट्र गारठणार
उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळं महाराष्ट्र गारठला आहे. राज्याला हुडहुडी भरली आहे. १७ शहरांचं तापमान अति गारठ्यामुळे राज्यातील महाबळेश्वर या थंडीच्या ठिकाणापेक्षाही कमी झाले आहे. महाराष्ट्र थंडीने गपगार झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. तर स्वेटर, टोपी, मफलर बाहेर आली आहेत. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
राज्यात हुडहुडी वाढली
सलग तिसऱ्या दिवशी अहिल्यानगर मध्ये राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका राज्यात कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पारा घसरला आहे. उत्तर भारतातून वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसांत राज्यात थंडीची लाट असेल. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानाचा पारा ७ ते १० अंशांपर्यंत खाली आले आहे. अहिल्यानगरमध्ये ६.६ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी परभणी तापमान 5.5 अंश सेल्सिअस इतके आहे. हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
दोन दिवसात महाराष्ट्र गारठणार
सरासरी सामान्य तापमानापेक्षा पुढील 2 दिवसांत कमी तापमान असणार आहे. उत्तरेकडील थंड वारे वेगाने वाहत असल्याने पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने 1६ जिल्ह्याना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.
सातपुडा परिसरात थंडीची लाट
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसर गारठला आहे. तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसने खाली आला आहे. सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव, तोरणमाळ, डाब आणि मोलगी या भागात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीमुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. तापमानात पुढील काही दिवसात घट होऊन गारठा अजून वाढण्याची शक्यता आहे.
पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते
दरम्यान, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. धुळे, निफाड आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत कोसळले आहे. रात्रीच्या वेळी वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे कमी केले आहे. उत्तरेकडील थंड लहरी कायम राहिल्याने पुढील काही आठवड्यांत थंडी आणखी वाढू शकते. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ला निनोच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे.
