Bjp - Shivsena Rada : वरळीत भाजप-ठाकरे गटात चुरस; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबईच्या वरळी परिसरात गुरुवारी भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सेंट रेजिस हॉटेलमधील कामगार युनियनवरून दोन्ही पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव अखेर उफाळून आला. अनेक वर्षांपासून या हॉटेलमध्ये ठाकरे गटाची कामगार युनियन कार्यरत आहे. मात्र भाजपने येथे नवी युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केल्याने वाद पेटला.
भाजपकडून काही कामगारांना संपर्क साधून नव्या युनियनसाठी समर्थन मिळवण्याची प्रक्रिया सुरू होती. याची माहिती मिळताच ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर हॉटेलच्या परिसरात दोन्ही पक्षांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आणि वातावरण चिघळले. या दरम्यान भाजपने परिसरात लावलेला फलक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उतरवून फाडून टाकला. फलक फाडल्याने दोन्ही बाजूंमध्ये संताप आणखी वाढला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. सेंट रेजिसच्या गेटवर काही काळ ढकलाढकलीही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हॉटेल प्रशासनालाही परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा वाढवावी लागली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पथक रवाना करत परिसराला संरक्षण कवच मिळवून दिले. संघर्ष वाढू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. भाजपने घेतलेल्या युनियन उपक्रमावर ठाकरे गटाने कडाडून आक्षेप घेतला आहे. “गेल्या अनेक वर्षांपासून आमचीच युनियन इथे कार्यरत आहे. आता सत्तेचा वापर करून भाजप जबरदस्तीने युनियन बनवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप ठाकरे गटाने केला. त्यांचे म्हणणे आहे की, काही कामगारांना दबावात किंवा आकर्षण दाखवून भाजपकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ठाकरे गटाचे पदाधिकारी हॉटेलबाहेर जमून भाजप पदाधिकाऱ्यांना तात्काळ परिसरातून बाहेर काढण्याची मागणीही करीत आहेत. “अनियमितपणे किंवा बेकायदेशीर रीतीने युनियन उभी करण्यात आली तर आम्ही शिवसेना पद्धतीने उत्तर देऊ,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये हा संघर्ष आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजपकडून सध्या याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नसली तरी पक्षाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी, “हॉटेलमधील अनेक कामगार आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. आम्ही कुठलाही नियम मोडत नाही,” असे मत मांडले. मात्र ठाकरे गटाचा दावा आहे की, संपूर्ण हालचाल राजकीय दबावाचा भाग आहे.
वरळी परिसर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या घटनेचे राजकीय परिणामही दिसू शकतात. सध्या सेंट रेजिस परिसरात कडेकोट सुरक्षा कायम असून पोलिसांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे. संघर्षानंतर काही वेळ वातावरण तणावपूर्ण राहिले असले तरी मोठी हानी टळल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना पुन्हा एकदा मुंबईतील कामगार संघटनांवर राजकीय वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा किती तीव्र आहे हे स्पष्ट करते.

