Maharashtra Politics : राज्यातील मनपा निवडणुकांत बंडखोरीचे सावट, बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मैदानात उतरवणार?

Maharashtra Politics : राज्यातील मनपा निवडणुकांत बंडखोरीचे सावट, बंडोबांना थंड करण्यासाठी नेते मैदानात उतरवणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे सत्र जोरात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ठाकरे ब्रँडच्या युतीपासून ते भाजप–शिंदे सेना युतीपर्यंत अनेक वॉर्डमध्ये अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल झाल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.

ठाकरे ब्रँडच्या युतीतून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांसोबतच काही ठिकाणी बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. वॉर्ड क्रमांक ९५ मधून उद्धव ठाकरे गटाच्या सेनेचे चंद्रकांत वायगंकर, वॉर्ड १०६ मधून सागर देवरे, वॉर्ड १६९ मधून कमलाकर नाईक, वॉर्ड १९३ मधून सूर्यकांत कोळी आणि वॉर्ड १९६ मधून संगीता जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. याच युतीतून मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी वॉर्ड क्रमांक ११४ मधून अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, भाजप आणि शिंदे सेना युतीतही बंडखोरीचेच चित्र पाहायला मिळत आहे. वॉर्ड क्रमांक २२५ ही जागा शिंदे सेनेला सुटली असताना, भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांनी त्या वॉर्डमधून अर्ज दाखल केला. यामुळे शिंदे सेनेच्या सुजाता सानप यांनीही अर्ज भरला. या गोंधळानंतर या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल, असे संकेत देण्यात आले असले तरी नेमके काय सुरू आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.

वॉर्ड १२९ मधून भाजपने आश्विन मते यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरेखा साळवी यांनी अपक्ष अर्ज भरत बंड पुकारले. याशिवाय वॉर्ड १६६ मधून राजेंद्र साळे, वॉर्ड ७३ मधून स्नेहल वाडेकर, वॉर्ड १२५ मधून मुकुंद काकड, वॉर्ड २०० मधून गजेंद्र धुमाळे, वॉर्ड १३१ मधून धनश्री बागल आणि वॉर्ड ६१ मधून ऊर्मिला गुप्ता यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा तेजस्विनी घोसाळकर यांना प्रवेश करताक्षणीच भाजपने दहिसरमधून उमेदवारी जाहीर केली. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला असून, पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.

याशिवाय, उद्धव ठाकरे गटातील श्रद्धा जाधव यांना तिकीट दिल्याच्या निषेधार्थ मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गदारोळ घातल्याची घटना घडली. एकूणच मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोरांमुळे राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, अनेक वॉर्डमध्ये लढती अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com