Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले. हातात हात घातले. एकमेकांशेजारी बसले भाषणंही केली. हे चित्र चब्बल 20 वर्षांनंतर दिसलंय. आता मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ एकत्र आलेत. पण या दोघांमध्ये कडवा संघर्ष का निर्माण झाला. त्यावेळी नेमकं असं काय घडलं, की हे दोघे वेगळे झाले.
नाव- उद्धव बाळासाहेब ठाकरे
जन्म- 27 जुलै 1960
नाव- राज श्रीकांत ठाकरे
जन्म- 14 जून 1968
ठाकरे घराण्यातील रक्ताचे सख्खे चुलत भाऊ बाळासाहेब ठाकरे नावाच्या धगधगत्या वादळाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले नेते. शिवसेना नावाच्या झंझावाती पक्षाच्या झेंड्याखाली दोघांचंही नेतृत्व फुललं आणि वाढलं. बाळासाहेब ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा फोटो पाहिला की महाराष्ट्राचं मन आजही हळवं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि पुतण्या म्हणून राज ठाकरेंमध्ये कधीही भेदभाव केला नाही. दोघांनाही बाळासाहेबांनी बोटाला धरून राजकीय मैदानात पाऊल टाकायला शिकवलं. पण एकदा मात्र भूकंप झाला हे दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले. कधीकाळी मांडीला मांडी लावणारे हे नेते एकमेकांविरोधात दंड थोपाटू लागले. पण असं नेमकं काय घडलं की हे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के राजकीय वैरी झाले.
राज-उद्धव यांच्यात वैर कसं वाढलं?
1995 साली राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेची धुरा हाती घेतली
राज ठाकरेंच्या कामांचा धडाका जोरात सुरू होता
बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जात होतं
1997 साली मुंबई मनपाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रिय
2002 साली मुंबई मनपा निवडणुकीची जबाबदारी उद्धव यांच्याकडे
राज ठाकरेंसह त्यांचे जवळच्या नेत्यांना डावलल्याचे आरोप झाले
30 जानेवारी 2003 रोजी राज यांनी कार्याध्यक्षपदासाठी उद्धव यांच नाव सुचवलं
राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रात रंगल्या
18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली
9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली, झेंडा जाहीर केला
तर अशा पद्धतीने राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. मग सुरू झाला ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष हे दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसायचे. मात्र त्यांचं राजकीय वैर मात्र तसंच पेटतं राहिलं. आता मात्र 2 दशकांनंतर हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले बोलले आणि हातात हात घातले. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकांत हे हात आणखी घट्ट होतात का? याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.