Ajit Pawar : ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची कोणतीही बैठक नाही’, अजित पवार यांचा खुलासा
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची कामगिरी अत्यंत सुमार ठरली आहे. विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत राष्ट्रवादीचा बुरूज उद्ध्वस्त केला. या पराभवामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली असून, महापालिका निवडणुकीनंतर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावर अजित पवार यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. “अशी कुठलीही बैठक झालेली नाही,” असे सांगत त्यांनी याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. कृषी प्रदर्शन २०२६ च्या उद्घाटनावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “आपण लोकप्रतिनिधी आहोत. मला सांगण्यात आलं की शरद पवार तिथे आले आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी गेलो. आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत. सध्या तरी आम्ही महायुती म्हणूनच काम करत आहोत.”
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या प्रश्नावरही अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. याबाबत स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानिक कार्यकर्ते परिस्थितीनुसार निर्णय घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीतील पराभवावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मतदार राजा हा सर्वात महत्त्वाचा असतो. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या आणि त्यांना मोठे यश मिळाले. भाजपचं मनापासून अभिनंदन.” पराभवामुळे खचून न जाता त्यातून शिकण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ईव्हीएमबाबत उपस्थित होणाऱ्या वादांवर अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली. “पराभव झाला की ईव्हीएमवर आरोप करायचे आणि विजय मिळाला की त्यावर बोलायचं नाही, यात मला पडायचं नाही,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले. तसेच बोटावरील शाई पुसल्याच्या प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
