Ashok Chavan On Congress : "कॉंग्रेसच्या काळात एवढा विकास नव्हता तेवढा..."; अशोक चव्हाणांचा कॉंग्रेसला टोला
भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी भाजप सरकारच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांची माहिती दिली आणि त्याचे खुलेपणाने समर्थन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "गेल्या 11 वर्षांत भाजप सरकारच्या काळात ज्या गतीने विकास झाला, तसा काँग्रेसच्या काळातही विकास झाला पण कालावधी जास्त लागला. भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात विविध विकास कामे दुपटीने केली आहेत."
गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "शंकरराव चव्हाण यांच्या कार्यशैलीची आणि त्यांच्या फाईलवरच्या नोंदींची प्रशंसा खुद्द अमित शहा यांनी माझ्याजवळ खासगीरित्या केली. त्यांच्या या विधानातूनच सर्व काही स्पष्ट होते." शंकरराव चव्हाण हे भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री होते. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व पारदर्शक कार्य केले असल्याची कबुली गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शंकरराव चव्हाण यांच्या कार्याची सार्वजनिकरित्या प्रशंसा केली आहे."
मुंबई-नांदेड वंदे भारत रेल्वे सेवा सुरू झाल्याबाबत चव्हाण यांनी "या सेवेसाठी रावसाहेब दानवे यांचे मोलाचे योगदान असल्याचे मी खुलेपणाने मान्य करतो," असे स्पष्ट केले. 'हर घर जल' ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले की, "देशभरात व राज्यभरात लाखो नागरिकांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. या कामासाठी राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आवश्यक परवानग्या व मंजुरी दिली असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत."