Maharashtra Weather : छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळीसह सोसाट्याचा वारा; वादळाने संभाजीनगर शहर धुक्यात गडप
आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात अचानकपणे धुळीचे वादळ उठले आणि काही क्षणांतच संपूर्ण शहर धुळीच्या लोटात गडप झाले. संध्याकाळी सहाच्या सुमारास जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली आणि त्यासोबत धूळ चारही बाजूंनी पसरली. विशेषतः शहरातील सातारा परिसरात धूळ इतकी घनदाट होती की समोरचे काहीही दिसत नव्हते. हे वादळ सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू होते. अनेक नागरिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात या वादळी दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ कैद केले, जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची उघडीप असून तापमानात वाढ झाली होती. मात्र आज सकाळपासूनच हवामान ढगाळ होते आणि संध्याकाळी वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वाऱ्याने संपूर्ण शहर धुळीच्या गर्द धुक्यात लपले. या वादळामुळे काही भागांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र कोणतीही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.