Bhaskar Jadhav On Amit Shah : "मातोश्रीवर जे युतीसाठी येत होते, ते आज देशाचे गृहमंत्री"
Bhaskar Jadhav On Amit Shah : "मातोश्रीवर जे युतीसाठी येत होते, ते आज देशाचे गृहमंत्री" Bhaskar Jadhav On Amit Shah : "मातोश्रीवर जे युतीसाठी येत होते, ते आज देशाचे गृहमंत्री"

Bhaskar Jadhav On Amit Shah : "मातोश्रीवर जे युतीसाठी येत होते, ते आज देशाचे गृहमंत्री"

भास्कर जाधवांचा महायुतीवर निशाणा: शिवसेनेच्या संघर्षाची आणि विश्वासघाताची कथा.
Published by :
Team Lokshahi
Published on

शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन साजरा करताना ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधवांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. मातोश्री परिसरात भरलेल्या या कार्यक्रमात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघर्षमय वाटचालीचं स्मरण करत, संजय राऊत, अनिल देशमुख यांच्यासह इतर शिलेदारांच्या जिद्दीला सलाम केला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी “आजचं उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे,” असं म्हणत उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण केली.

भास्कर जाधव यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “गेल्या काही वर्षांमध्ये ज्या मित्रांनी 35 वर्षे सोबत घालवली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. जे आज देशाच्या गादीवर बसले आहेत, त्यांनीच शिवसेना संपवण्याचं नियोजन केलं. 2014 मध्ये भाजपाने युती तोडली आणि नंतर विश्वासघात केला. पण त्या वेळी उद्धवसाहेबांनी एकाकी लढा दिला आणि 63 आमदार निवडून आणले.”

“मातोश्रीवर जे युतीसाठी येत होते, तेच आज देशाचे गृहमंत्री झाले आहेत.अमित शहा आणि जे उद्धवसाहेबांवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतायत, तेच देवेंद्र फडणवीस होते जे 2019 मध्ये अजित पवारांसोबत 80 तासांचं सरकार बनवून शिवसेनेच्या पाठीवर खंजीर खुपसत होते,” असा स्पष्ट आरोपही भास्कर जाधव यांनी केला.

पाठोपाठ चौकशा, खच्चीकरणाचा डाव

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने हल्ला करत अनेक शिलेदारांवर सीबीआय, ईडी, आयकर, पोलिस चौकशी अशा चौकशा लादण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “अनेकांना भीतीपोटी दुसऱ्या गोटात जावं लागलं, पण संजय राऊतसारखा योद्धा अजूनही इथे व्यासपीठावर आहे,” असं सांगताना त्यांनी राऊत यांचं अभिनंदन केलं.

संजय राऊतांनी लिहिलेले पुस्तक वाचा

“संजय राऊतांनी लिहिलेलं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रत्येक शिवसैनिकाने वाचावं. ही लढाई रस्त्यावरची असली, तरी आज ती सोशल मीडियावरची आणि बुद्धीची लढाई आहे. म्हणून अभ्यास करून, विचारपूर्वक ही लढाई लढावी लागेल,”असा संदेश त्यांनी दिला. याशिवाय, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ‘डायरी ऑफ अ होम मिनिस्टर’ आणि तुळशीदास भोईटे यांचं ‘भाजपा जिंकली!’ पण कशी? हे पुस्तकंही वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला.

“सत्ताधाऱ्यांनी उद्धवसाहेबांना खच्ची करण्याचा प्रयत्न केला, पण ते कधीही डगमगले नाहीत. गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली, तरी चेहरा खाली केला नाही. त्यांच्या नेतृत्वात आपण अजूनही इथेच आहोत, अभिमानाने उभे आहोत,”असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार पाठिंबा दिला.

भास्कर जाधव यांच्या भाषणातून स्पष्ट दिसून आलं की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास अजूनही घट्ट आहे. संजय राऊत, अनिल देशमुख, इतर शिवसैनिकांची जिद्द, आणि ‘विचारांनी लढा’ या संदेशाद्वारे आजच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा संचारली आहे. “हा लढा संपलेला नाही – तो अजून जोरात सुरू आहे,” या शेवटच्या ओळीतूनच त्यांचा संपूर्ण संदेश समजून येतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com