प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी; जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरु
शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने एक मोठी कारवाई केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक करुन प्रशासनाच्या वतीने कबरीशेजारील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अफजल खान कबरी लगतचा अनधिकृत बांधकामाचा वाद सुरू होता. याच पार्श्वभूमीवर आता साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत.
अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता.
या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून केलं जात आहे.