Mumbai : मुंबईत अल्पसंख्यांक मुलींसाठी नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणार
मौजे अनिक, चेंबूर, अणुशक्ती नगर परिसरात अल्पसंख्यांक मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. क्रीडा, युवक व अल्पसंख्यांक व औकाफ मंत्रालय विभागाचे मंत्री मा. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
अल्पसंख्यांक, विशेषतः मुस्लीम समाजातील मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिक्षण हे समाज प्रगतीचे प्रमुख साधन असून, अल्पसंख्यांक विद्यार्थिनींना आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण मिळवून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी अणुशक्ती नगर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत नियमानुसार प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले.
या महाविद्यालयात केवळ अल्पसंख्यांक नव्हे तर इतर समाजातील मुलींनाही प्रवेश मिळावा, आधुनिक साधनसामुग्री, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह, इंटरनेट सुविधा यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, यावर भर देण्यात आला. प्रस्ताव सादर करताना या सर्व बाबींचा समावेश असावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीस आमदार सना मलिक, माजी मंत्री नवाब मलिक, अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्री. रूचेश जैवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. गोविंद संगवई, सहसचिव श्री. संतोष खोरगडे, उपसचिव श्री. मिलिंद शेनॉय, कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.