PBKS vs RCB IPL 2025 : आयपीएलचा थरार अंतिम टप्प्यात; आज मिळणार अंतिम सामना खेळणारा पहिला संघ
आयपीएल २०२५ चा थरार आता अंतिम टप्पात पोहोचला आहे. अवघ्या चार दिवसांत यंदाच्या सिझनची ट्राॅफी कोणता संघ जिंकणार हे, क्रिकेटप्रेमींना समजणार आहे. आज, गुरुवारी पंजाब किंग्ज आमि रॉयल चॅलेंजर्समध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार असून हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम लढतीत पोहोचणार आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजरमधील आजचा सामना नक्कीच रंजक ठरणार आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक धक्कादायक चढ-उतार पाहायला मिळाले. सुरूवातीला खालच्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं चांगली खेळी करत अखेर पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवले. तर सुरूवातीपासूनच अव्वल राहिलेल्या गुजरात टायटन्स संघानं शेवटी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानलं. धक्कादायक म्हणजे आजवर एकही आयपीएल सामना न जिंकलेली रॉयल चॅलेंजर्सची टीम यंदा दुसऱ्या क्रमांकावर आली असून अंतिम सामन्यासाठी एक पाऊल दूर आहे. तर पंजाब किंग्जनं उत्तम खेळ दाखवून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.
आज होणारा पहिला क्वालिफायर राऊंड पंजाब आणि बंगळुरूमध्ये रंगणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम सामना खेळणार आहे. तर हरणाऱ्या संघाला दुसरा क्वालिफायर राऊंड खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच उद्या, गुजरात आणि मुंबई इंडियन्समध्ये पहिला एलिमिनेटर राऊंड पार पडणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर राऊंडमध्ये पहिल्या क्वालिफायरमध्ये हरलेल्या संघासोबत खेळणार आहे. तर दुसरा क्वालिफायर राऊंडचा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पहिला क्वालिफायर जिंकणाऱ्या संघाला टक्कर देणार आहे.