Gold-Silver Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीचे दरही खाली; जाणून घ्या आजचे बाजारभाव
अमेरिकेतील शटडाउन, टॅरिफ तणाव आणि व्याजदरांतील बदलाच्या अंदाजामुळे जागतिक बाजारात अस्थिरता कायम आहे. भारतात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली असून, चांदीच्या दरातही घट नोंदवली गेली आहे.
शनिवारी देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दरात किरकोळ घट झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 65 रुपयांनी कमी झाला आहे, तर चांदीच्या दरात 151 रुपयांची घसरण झाली. सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या किंमती थोड्या कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी ही एक अनुकूल संधी मानली जात आहे.
मागील आठवड्यात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. 30 सप्टेंबर रोजी किंमत 1,17,516 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचली होती. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, अमेरिकेतील शटडाउन आणि जागतिक टॅरिफ धोरणांमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, पुढील काही महिन्यांत किंमतीत थोडी स्थिरता किंवा घट दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आजचे सोने-चांदीचे भाव
गुडरिटर्न्स या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत घटून 11,804 रुपये प्रति ग्रॅम झाली आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10,820 रुपये प्रति ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमतही 8,853 रुपये प्रति ग्रॅम नोंदवली गेली आहे.
चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली असून, देशातील सरासरी दर 1,51,000 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या दरात थोडी वाढ दिसत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा कल अजूनही सोन्यात सुरक्षित गुंतवणुकीकडेच आहे.
महानगरांतील दर
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरू आणि पुणे येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 11,940 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 10,945 रुपये आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोने 11,946 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,950 रुपये दराने विकले जात आहे. दिल्लीमध्ये सर्वाधिक दर असून, येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 11,955 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 10,960 रुपये प्रति ग्रॅम आहे.