Bhide Bridge in Pune : भिडे पूल बंद केल्यामुळे डेक्कन आणि नारायण पेठमध्ये वाहतुककोंडी; नागरिकांची वाहतूक पोलीस वाढवण्याची मागणी
बाबा भिडे पूल मंगळवारी सकाळपासून वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे डेक्कन जिमखाना आणि नारायण पेठ भागातील महत्त्वाच्या चौकांवर वळण घेणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवाशांनी त्या भागात अधिक वाहतूक वॉर्डन्स नेमण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी कामावरून परतणाऱ्या वेळेत झेड ब्रिजच्या सुरुवातीच्या भागात, जंगली महाराज रस्त्यावर, केळकर रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
हा पूल ६ जूनपर्यंत बंद राहणार असून, मुठा नदीवर फूट-ओव्हर ब्रिज उभारण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. हा पूल डेक्कन मेट्रो स्थानकाला नदीच्या पलिकडच्या भागाशी जोडणार आहे. ज्यामुळे पेठ क्षेत्रातील नागरिकांना मेट्रो स्थानक गाठणे सुलभ होईल. मेट्रो प्रशासनाने वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी वाहतूक विभागाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रवाशांना डेक्कन परिसरात संध्याकाळच्या वेळी मोठ्या वाहतूक अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून झेड ब्रिजजवळील छोट्या गल्ल्या, लकडी पूल आणि केळकर रस्त्याचा वापर केला जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी अपील केले आहे की, चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर आणि रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत अडथळ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. वाहतूक विभागाने सांगितले की, पुढील काही दिवस ही व्यवस्था तपासली जाईल आणि आवश्यक असल्यास सुधारणा केल्या जातील. या सगळ्यावर आता पुणे वाहतूक पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.